ही साईट 1024 गुणीले 768 किंवा त्याहून अधिक रिझॉल्युशनमध्ये सर्वोत्तमप्रकारे पाहता येईल

 

वाचनाने काय गवसते?

 

परत पहिल्या पानाकडे


 

Share on Facebook

स्वामी विवेकानंदांच्या शब्दांत शिक्षणाची व्याख्या सांगायची तर "शिक्षण म्हणजे मनुष्यात अगोदरपासून वसत असलेल्या पूर्णत्वाचे प्रकटीकरण". शिक्षक विद्यार्थ्याला शिकवितो तेव्हा तो बाहेरुन कोणतीही गोष्ट विद्यार्थ्याच्या मेंदूत भरत नाही. शिक्षक विद्यार्थ्याच्या मनात असलेले अज्ञानाचे पडदे दूर करण्याचे काम करतो. केवळ पोटापाण्याचा उद्योग मिळवून देणे हे शिक्षणाचे उद्दीष्ट असूच शकत नाही. शिक्षण मनुष्याला आपल्या पायावर उभे करण्याचे काम करते, आणि स्वत:च्या पायावर उभे राहणे हे आर्थिक सुबत्तेच्या प्राप्तीपेक्षा कितीतरी अधिक मोठे ध्येय आहे. त्यात पक्क्या वैचारिक पायाची उभारणी अभिप्रेत आहे. "कोऽहम?" असा जो प्रश्न प्राचीन काळापासून मनुष्याला पडत आलेला आहे त्याचे उत्तर शोधण्याची वाट शिक्षणामुळे उजळली जायला हवी.

आपल्याला गवसलेली वाट दुस-याला दाखवावी म्हणून ग्रंथांची निर्मिती झाली. वाचन म्हणजे एका अर्थाने परकायाप्रवेश असतो. लेखकाच्या अनुभवविश्वाशी समरस होउन वाचक ते अनुभव पुन्हा जगतो. या आभासी जगण्यातून प्राप्त होणारी अनुभवसंपन्नता वाचकाला वैचारिकदृष्ट्या प्रगल्भ बनविते. एका आयुष्यात अनेक पिढ्यांचे ज्ञानसंचित केवळ वाचनामुळे प्राप्त होउ शकते.

आजचा काळ हा माध्यमांच्या प्रचंड मा-याचा काळ आहे. टेलिव्हिजनपासून ते ट्विटरपर्यंत अनेक माध्यमे आपल्या दिमतीला हजर आहेत. या सगळ्या गदारोळात वाचनसंस्कृती नाहीशी होईल की काय असे वाटणे सहज शक्य आहे. मात्र याचे उत्तर बाहेरच्या जगात शोधण्यापेक्षा आपल्याच मनात शोधायला हवे. श्यामची आई पुस्तक वाचल्यानंतर ज्याच्या डोळ्यातून पाणी वाहिले नाही असा वाचक विरळाच सापडेल. मग हा अनुभव आपल्या मुलांनी घ्यायला हवा की नको हे आपणच ठरवायला हवे ना? साने गुरुजी आउटडेटेड झाले ही आपल्याच मनाची समजूत तर नाही ना याचाही शोध घ्यायला हवा. विसाव्या शतकात देवाला रिटायर्ड केले आता एकविसाव्या शतकात माणसातल्या माणूसपणाला हद्दपार करण्याकडे तर आपण चाललो नाही ना याचा क्षणभर थबकून विचार करायला हवा.

ही सर्व यंत्रसाधने, हा माध्यमांचा मारा विधायकदेखील आहे. यातील एक साधन वापरुनच तुम्ही हा लेख वाचता आहात. यंत्रे काय, विज्ञान काय ननैतीक असते. त्याचा वापरच त्यांची ओळख ठरवितो. इंटरनेटमुळेच तर आज घरबसल्या हवी ती पुस्तके मागवून घेण्याची सोय झाली आहे. उद्या कदाचित किंडल किंवा तत्सम साधनांचा वापर करुन आपण पुस्तके वाचू. प्रश्न आहे तो पुस्तके का वाचावीत किंवा पुस्तके वाचून काय गवसते हा.

तुमच्या मुलांनी चांगले वाचक व्हावे असे तुम्हाला वाटत असेल तर त्यासाठी आमच्याकडे काहीही उपाय नाही. कारण यासाठी जो एकमेव उपाय आहे तो तुमच्याकडेच आहे. तुमच्या मुलांनी चांगले वाचक व्हावे असे तुम्हाला वाटत असेल तर सर्वात आधी "तुम्ही चांगले वाचक असायला हवे किंवा व्हायला हवे!". तुम्ही चांगले वाचक असाल किंवा व्हायला तयार असाल तर मात्र आपण खूप काही करु शकतो. पुस्तकांची गटवारी, उपलब्धता, वितरण या सगळ्या यांत्रिक (mechanical) गोष्टी आहेत. उपलब्ध तंत्रसाधनांच्या वापराने त्या सहज करता येण्यासारख्या आहेत.

मुलांमध्ये वाचनाची आवड विकसित करावी लागते. वाचायला शिकल्यानंतर आपोआप वाचनाची आवड निर्माण होणार नाही. उलट सुरुवातीच्या काळात अडखळत, अक्षर-अक्षर वाचताना कष्टच पडतील. अशा वेळी पालकांनी मुलांना वाचून दाखविले तर त्याचा खूप फायदा होतो. पुस्तकातील गोष्टींची गोडी लागते. वैयक्तिक अनुभव सांगायचा तर आम्हांला माधुरी पुरंदरे यांच्या पुस्तकांची यात खूप मदत झाली. माधुरी पुरंदरे यांची पुस्तके कालसुसंगत आहेत, मुलांचे भावविश्व समजून घेउन लिहिलेली आहेत. त्यातील भाषा अतिशय सोपी आणि सहज समजेल अशी आहे.

एकदा वाचनाची गोडी लागली की मुले आपणहून वाचायला लागतात. त्यांना चांगली पुस्तके आणून देणे आणि वाचलेल्या पुस्तकांविषयी त्यांच्याशी गप्पा मारणे एवढे आपण केले की झाले. मात्र घरात "वाचनसंस्कृती" नांदत असणे मात्र गरजेचे आहे. वाचनासाठी कुटुंबातील सर्वांनी एक विशिष्ट वेळ ठरवून घेणे खूप उपयोगाचे ठरते.

इतर माध्यमांचा विधायक वापर करणे शक्य असले तरी टेलीव्हिजन हा वाचनसंस्कृतीचा मोठा शत्रू ठरतो. याचे कारण टिव्हिवरील कार्यक्रमांवर आपले नियंत्रण नसते. थोडासा विचार करुन मनापासून सांगा टेलीव्हिजनवरील मालिका पाहणे किती योग्य आहे? टेलीव्हिजनवरील मालिका काय किंवा कार्टून्स काय तुमचा मेंदू बधीर करतात. वेगवान हालचाली, कर्कश्श संगीत, चढे आवाज यातून तुम्हाला विचार करण्याची बंदी जणू घातली जाते. दृश्य माध्यमांचीही एक ताकद असते. एखादा सिनेमा, एखादे नाटक अतिशय समृध्द आशय तुमच्यापर्यंत पोहोचवू शकते. मात्र टेलीव्हिजन "निवडीचे स्वातंत्र्य" देत नाही ही मोठी अडचण आहे. टेलीव्हिजनऐवजी वाचनासाठी कुटुंबातील सर्वांनी एक विशिष्ट वेळ ठरवून घेणे शक्य आहे.

वाचनाने भाषिक कौशल्ये सशक्त होतात. आशय समजून घेणे सहजसाध्य होते आणि याचा अभ्यासात थेट उपयोग आहे. सामान्यत: शाब्दिक गणिते सोडविताना मुले अनेकदा चुकतात कारण ती आशय लक्षात घेतानाच चुकतात. विज्ञानातदेखील भाषेवर प्रभुत्व असणारी मुले चटकन संकल्पना समजून घेउ शकतात किंवा त्या सहजरित्या मांडू शकतात. आपले विचार योग्य भाषेत सुविहितपणे मांडता येणे किती महत्वाचे आहे हे आपण जाणतोच. 

वाचनसंस्कृतीच्या विकासातील आणखी एक अडसर शिक्षणाचे माध्यम हा झाला आहे. शिक्षणाचे माध्यम इंग्रजी म्हणून मराठी वाचणे दुरापास्त आणि सकस इंग्रजी वाचनसाहित्याचा अभाव अशा दुहेरी कात्रीत समाजाचा मोठा गट सध्या अडकला आहे. इंग्रजीतून विचार करणारी, जीवनभाषाच इंग्रजी असणारी कुटुंबे असतात, मात्र त्यांची संख्या अतिशय कमी आहे. इतर कुटुंबांमधून घरचे वातावरण मराठी पण शिक्षणाचे माध्यम इंग्रजी असे द्वैभाषिक द्वंद्व निर्माण झाले आहे. यातून बाहेर पडण्याचा मार्ग म्हणजे एक भाषा जीवनभाषा म्हणून ठामपणे निवडणे हा आहे. आणि मराठी जीवनभाषा म्हणून निवडणार असाल तर थोड्या प्रयासाने तुमची मुले मराठी वाचायला नक्की शिकतील. त्यांच्या प्रगत जनुकांमध्ये ती क्षमता नक्की आहे. एका भाषेवर प्रभुत्व मिळविलेली व्यक्ती इतर भाषा सहज शिकू शकते. इंग्रजी भाषेतून व्यावसायिक संवाद (उपजीविका) आणि मराठीतून कौटुंबिक/व्यक्तीगत संवाद (मुख्यजीविका) असे दुहेरी भाषिकजीवनच कदाचित भविष्याचा मार्ग असेल.

इंग्रजीमध्ये सकस वाचनसाहित्य उपलब्ध नाही किंवा इंग्रजी वाचनसंस्कृती इथे निर्माणच होउ शकत नाही (किंवा निर्माण होउ नये) असे अजिबात म्हणणे नाही. याउलट इंग्रजी साहित्य जागतिक आहे. इंग्रजी ही जगाची संवाद साधण्याची समान भाषा बनली आहे. अफगाणी लेखक असो वा ब्राझीलीयन लेखक असो त्याचे साहित्य आपल्यापर्यंत पोहोचण्याचे माध्यम इंग्रजी भाषाच आहे. त्याच वेळी तुकोबा/ज्ञानेशाची मराठी या मातीतली आहे, आणि आपली नाळ या मातीशी जुळलेली आहे. जागतिकीकरणोत्तर प्रादेशिकता आणि अस्मितांचे प्रकटीकरण या गोष्टी आपले माणूसपण टिकवून ठेवण्यातील महत्वाचा दुवा आहेत. तेव्हा मराठी आणि इंग्रजी दोन्ही भाषांतील वाचनसंस्कृती निर्माण करुया. मराठीपासून सुरुवात करणे ब-याचजणांसाठी अधिक सोपे व अधिक आनंददायी आहे.

महाएज्युटेकनेट या तुमच्या-आमच्या व्यासपीठाद्वारे आपण यासाठी काही गोष्टी करु शकतो. वयोगटानुरुप पुस्तकांची गटवारी करणे, पुस्तके सहजरित्या उपलब्ध करुन देणे, बालवाचकांच्या परस्परसंवादासाठी जागा मिळवून देणे अशा अनेक गोष्टी करण्यासारख्या आहेत. हा लेख यातील पहिली पायरी आहे. तुमच्यासारख्या सुजाण पालकांच्या सहयोगानेच पुढची वाटचाल होईल. या लेखाच्या आशयाशी तुम्ही सहमत असाल तर Share on Facebook  ही लिंक जरुर क्लिक करा. समविचारी पालक या प्रक्रियेशी जोडले जायला त्यामुळे मदत होत राहील.

- महाएज्युटेकनेट टीम


 

संपर्क cyberedutech@gmail.com