ही साईट 1024 गुणीले 768 किंवा त्याहून अधिक रिझॉल्युशनमध्ये सर्वोत्तमप्रकारे पाहता येईल

 

वीजचोराला पकडले अथवा शीतकपाटाला सुट्टी (सप्टेंबर 12, 2009)

 

(परत पहिल्या पानाकडे)


 

 

हे अगदीच ताजं ताजं आहे खरं तर इतक्यात लिहायला नको. पण लिहितोच. गेले दोन महिने वीजेचं बिल जास्त येत होतं. कारण काही समजत नव्हत. दरमहिना १५० ते १८० युनिटस् व्हायचे ते अचानक २२० ते २३० युनिटस् व्हायला लागले. वीजबिलातही ३०० ते ५०० रुपयांची वाढ झाली.

याची कारणं शोधताना प्रथम संशय घेतला तो इनव्हर्टरचा. त्या बिचा-याला एक दिवस पूर्ण बंद ठेवला. तो ओव्हरचार्ज होत असावा असा संशय होता. पण इनव्हर्टर बंद करुनही दररोजच्या युनिटमध्ये विशेष घट दिसली नाही. मग पाळी आली शीतकपाट किंवा फ्रीजची. आमचा फ्रीज २० वर्षे जुना आहे. तो एव्हाना अधिक वीज खायला लागला असणार असा संशय होताच. पण फ्रीज बंद केल्याने नाट्यमय बदल दिसला. रोजचे ७.५ ते ८ युनिटस खर्च होत होते ते प्रमाण केवळ २ वर आलं.

एका छोट्याशा निरीक्षणाने केवढ मोठ्ठ सत्य दाखवलं. आमचा म्हातारबुवा फ्रीज रोज ५.५ ते ६ युनिटस वीज गट्टम करायचा. ३.३० रु. प्रतियुनिटप्रमाणे रोजचे सुमारे २० रुपये, म्हणजे महिन्याचे सुमारे ६०० रुपये वर्षाला ५००० रु. शिवाय कोयनेचं किती घमी पाणी किंवा किती किलो दगडी कोळसा. आणि त्या बदल्यात काय मिळायच? फ्रीजच पाणी आम्ही कधीच पित नाही. मग भाज्या, दूध, लोणी वगैरे ताज्या राखण्यासाठी वर्षाला ५००० रुपये खर्च करणं संयुक्तिक आहे का असा विचार मनात आला.

आता कुणी म्हणेल की नवा फ्रीज घ्या ना चार तारे वाला (वीज बचतीचे तारे). पण फ्रीज शिवायच जगलं तर?

फ्रीज घेतला ना तेव्हा किती मस्त गार गार वाटलेल. १९८९ साल होत ते. पण आता वाटत फ्रीजचा भोग भोगून संपलाय. त्याच अप्रूप, नवलाई संपलीय, मर्यादित उपयोग तेवढा उरलाय तो ही टाळता आला तर वर्षाला काही शे युनिटस तरी नक्की वाचतील (चार तारे वाला फ्रीज आहे असं समजून)

हे सगळ प्रायोगिक स्तरावर आहे. ४ महिने फ्रीजशिवाय जगून बघायचे आहेत. वेळोवेळी सत्य नोंदवित राहीनच.

मंदार परांजपे
mandarrp@gmail.com

ता. क. आज दि. 10/08/2012 रोजी पर्यंत शीतकपाटाचा वापर यशस्वीपणे बंद आहे. आणि यापुढेही राहिल अशी आशा आहे.

 

 

संपर्क cyberedutech@gmail.com