ही साईट 1024 गुणीले 768 किंवा त्याहून अधिक रिझॉल्युशनमध्ये सर्वोत्तमप्रकारे पाहता येईल

 

खादी प्रतिकात्मक परंतु मनापासून! (सप्टेंबर 16, 2009)

 

(परत पहिल्या पानाकडे)


 

 

गेल्या सहा महिन्यांमध्ये ६०० पेक्षा अधिक शेतक-यांनी आत्महत्या केल्या. आपल्या सामाजिक जीवनाचा एक अतिशय महत्वाचा घटक टाहो फोडून सांगत राहतो की नाही तुमच्या जगात आम्हाला जगवत. दहा पंधरा हजाराचं कर्ज माणसाला जीवन संपवायला लावत हे किती भयानक आहे. दहा पंधरा हजार ही  रक्कम याच समाजातल्या‍ कित्येकांच्या  आयुष्यात मौजमजेसाठी सहज खर्च होणारी रक्कम असते.

शेतक-यांसाठी आपण थेट काही करु शकतो असं सुचत नाही आपण आपल्याच व्यापात असतो. आपलं कुटुंब, आपली कामं. हळहळ व्यक्त करण्यावाचून दुसरं आपण काहीच करु शकत नाही.

पण आपण विचार नक्कीच करु शकतो, आपण शिकलेले आहोत अमेरिकेची अर्थव्यवस्था का कोसळली हे आपल्याला नेमक ठाउक आहे. पण शेतकरी आत्महत्या का करतात हे कुणी फारस सांगताना दिसत नाही.

आत्महत्या केलेल्या शेतक-यांपैकी बरेच कापूस उत्पादक होते. बाजारात सुती कपड्यांना तर चांगली मागणी आहे. कॉटन किंग, पीटर इंग्लंड, केंब्रीज कितीतरी ब्रॅण्ड. मग शेतक-यांचा कापूस विकला जात नाही असं तर नक्कीच होत नाही. मग काय होत असेल? बाजारात एक शर्ट उत्पादित करायची संपूर्ण किंमत सुमारे ४० रुपये आहे. (संदर्भ अर्धी मुंबई, युनीक फीचर्स). या ४० रुपयात कापूस, त्याचं सूत तयार करणे, कापड विणणे, कापड रंगविणे, ट्रान्सपोर्ट, शिलाई सगळ सगळ येत. आणि बाजारात जेव्हा हाच शर्ट विक्रीला येतो तेव्हा त्याची किंमत किमान २०० रुपये असते. ४० रुपयातले शेतक-याला किती मिळतात आणि कॉटन किंग, पीटर इंग्लंड, केंब्रीज यांना किती मिळतात विचार करण्यासारखी गोष्ट आहे.

चरखा क्रांतीचं साधन आहे गांधीजी म्हणाले तेव्हा बुध्दिवादी त्याची कुचेष्टा करीत राहिले. आज तेच बुध्दिवादी (पक्षी तुम्ही आम्ही आपण सगळे) कॉटन किंग, पीटर इंग्लंड, केंब्रीजचे कपडे घालतो आणि अमेरिकेची अर्थव्यवस्था का कोसळली याची चर्चा करण्यात धन्यता मानतो.

चरखा ही व्हॅल्यू ऍ़डीशन आहे कापसापेक्षा सूताला अधिक भाव आहे ती रक्कम थेट शेतक-याच्या खिशात जाणार आहे. खादी शेतक-याला जगवू शकणारी अमृतवेल आहे. हे जाणवत गेल तेव्हा खादी वापरण्यातली मजा कळायला लागली. खादीचा झब्बा आणि लेंगा घालून फिरणं मला अजून जमत नाही पण खादीचा शर्ट आणि जीन्सची पॅन्ट घालण्याइतका माझा धीर चेपला आहे.

आज खादीच कापड महाराष्ट्रातून येत नाही पण भारतातल्याच कुठल्यातरी राज्यातून आंध्र, उत्तर प्रदेशातून येतं  मी शर्टासाठी खर्च करीत असलेल्या २०० रुपयातला बराचसा भाग शेतकरी आणि हातमागधारकाकडे जातो. मी देत असलेली शिलाई माझ्याच गावातल्या शिंप्याला मिळते.

आज ना उद्या विदर्भातला शेतकरी संघटीत होईलच खादी, हातमाग यांची सहकारी चळवळ उभारीलच.

खादीचे कपडे वापरणं भलेही प्रतिकात्मक असेल पण ते मनाला समाधान देणारे आहे.

मंदार परांजपे
mandarrp@gmail.com

 

 

संपर्क cyberedutech@gmail.com