सांगोला
श्री. मुदलीयार यांनी दिलेल्या माहितीनुसार मा.
आमदारांची भेट घेण्यास आम्ही सांगोला येथे निघालो. सोलापूर ते सांगोला
हे अंतर सुमारे ९० किमी असून सुमारे अडिच तासांचा हा प्रवास आहे. वाटेत
मंगळवेढा हे गाव लागते. सोलापूर - मंगळवेढा रस्त्यावर हिरवाईची काही
बेटे दिसण्यात आली. काही ठिकाणी तर चक्क केळीची लागवड केलेली दिसून
आली. एके ठिकाणी नदीला पाणी होते. शेतक-यांनी केलेली लागवड वगळता झाडी
मात्र अभावानेच दिसत होती.
मंगळवेढा - सांगोला प्रवासात वातावरणातील रखरखाट
वाढलेला दिसला. दुपारी बाराच्या सुमारास सांगोल्यात पोहोचलो तेव्हा
उन्हाची काहिली चांगलीच जाणवू लागली होती. बसस्थानकाच्या मागच्या
बाजूला सुमारे ५-७ मिनिटांच्या चालण्याच्या अंतरावर मा. आमदारांचे
निवासस्थान आहे. मा. आमदारांचे कार्यालय अतिशय साधे आहे. आमच्या
दौ-याचा उद्देश कळताच एखाद्या शिक्षकाप्रमाणे आमदारसाहेब माहिती देउ
लागले. त्यांच्याकडून मिळालेली माहिती खालीलप्रमाणे -
"सोलापूर जिल्ह्यातील सांगोला तसेच सातारा जिल्ह्यातील माण, जत
हे तालुके या भागात १० तील ५ वर्षे दुष्काळ असतो. मान्सून वा-यांनी
वाहून आणलेल्या पावसापैकी सुमारे ४२ प्रतिशत पाउस कोकण व
सह्याद्रीचा घाटमाथा या भागात पडून जातो. कमी बाष्पाचे ढग
त्यापुढील प्रदेशात येतात, तेव्हा तेथील कोरड्या हवेमुळे ते आणखी
वर जातात व त्यांची बाष्प सामावून घेण्याची क्षमताही वाढते.
परिणामी पुढील १०० किमीच्या टप्प्यात अतिशय कमी पाउस पडतो.
सांगोला, माण, जत हे तालुके अशा पर्जन्यछायेच्या प्रदेशात मोडतात.
या भागात जो पाउस पडतो तो परतीच्या मान्सून वा-यांमुळे पडतो.
त्यामुळे रबी हंगामात येथे पिके घेतली जातात. पाउस पडला नाही तर
रबी हंगाम वाया जातो. कमी पाणी आवश्यक असणारे डाळींबाचे पिक ठिबक
सिंचनासारख्या आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करुन येथील शेतक-यांनी
घेण्यास सुरुवात केली. पहिली काही वर्षे चांगले पिक आल्यावर
डाळींबावर रोगांचा हल्ला झाला, यावर शासकिय यंत्रणेला आजवर
परिणामकारक उपाय शोधता आलेला नाही. यानंतर शेतक-यांना पशुपालन व
दुग्धव्यवसाय करण्यास प्रोत्साहित केले गेले. मात्र पावसाअभावी
चारा व पाणी यांची कमतरता जाणवू लागल्याने आजमितीस सुमारे ९० चारा
छावण्या सांगोला तालुक्यात सुरु करण्याची वेळ आली आहे.
उजनी सारख्या मोठ्या धरणामध्ये पाणी साठविण्याची क्षमता आहे.
मात्र इरिगेशन विभागाच्या अपूर्ण कामांमुळे शेतक-यांना त्याचा
फायदा होत नाही. अनेक कामे शेवटच्या टप्प्यात येउन रेंगाळली आहेत.
लिफ्ट इरिगेशन तंत्राने शेतक-यांच्या शिवारात पाणी पोहोचविता येणे
शक्य आहे, मात्र शासकिय अनास्थेमुळे ते घडत नाही."
दुष्काळी प्रदेशात शेतक-यांच्या हितासाठी स्वत:ला गाडून घेउन अनेक
वर्षे काम करणा-या आमदार साहेबांबद्दल सामान्य जनतेच्या मनात
असलेला आदर दिसला. त्यांचा साधेपणा आणि कामाच्या विषयाबद्दलची
आस्था व ज्ञान यांचा आमच्या मनावर ठसा उमटला.
सांगोला - चारा छावणी आमदार साहेबांच्या
सूचनेनुसार सांगोला येथील चारा छावणी पाहण्यासाठी आम्ही निघालो.
१७२० लहान व मोठ्या जनावरांना या छावणीत आश्रय मिळाला आहे.
"सांगोला तालुका सहकारी दुध उत्पादक संघ" या संस्थेमार्फत अध्यक्ष
श्री. मारुती
बनकर (जे सांगोल्याचे नगराध्यक्षही आहेत) यांनी ही छावणी चालविली
आहे. छावणी प्रमुख श्री. शेणवे यांना प्रथम आम्हाला
छावणीच्या कार्यपध्दतीची माहिती दिली.
-
सरकारतर्फे प्रत्येक मोठ्या गुरासाठी ६० रु. तर लहान
जनावरासाठी ३० रु. अनुदान दिले जाते. अनुदान महिनाअखेरीस हिशेब
तपासणीनंतर दिले जात असल्याने जो माणूस १५-२० लाख रुपयांचे क्रेडिट
उभारु शकतो, तोच छावणी चालवू शकतो.
-
छावणीच्या संपूर्ण कार्यपध्दतीचे सीसीटीव्ही मॉनिटरींग
सुरु असते. प्रत्येक गुराच्या गळ्यात बारकोड अडकविलेला असतो. गुरांचे
दुध शेतकरी
छावणीच्या ठिकाणीच काढतो, ज्या बैलजोड्या शेतीकामासाठी बाहेर जातात,
त्यांची नोंद ठेवली जाते, व संध्याकाळच्या आत त्या जोड्या परत छावणीज
आणाव्या लागतात.
-
सुमारे ४ किमीच्या परिसरातून शेतक-यांनी गुरे आणलेली
आहेत. घरटी एक माणूस छावणीमध्येच मुक्काम करुन असतो. त्याचे जेवणखाण
कुटुंबीय घेउन येतात. काही जण छावणीतच झोपडी उभारुन राहतात.
-
गुरांसाठी पाणी सध्या टॅन्करने आणले जाते. ज्या
विहिरींतून पाणी आणले जात आहे त्या आटल्या की नगरपालिकेकडून पाणी विकत
घेतले जाईल.
-
पशुखाद्य व चारा विकत आणला जातो. किती प्रमाणात
पशुखाद्य व चारा द्यायचा ते सरकारने ठरवून दिले आहे. त्याची अंमलबजावणी
केली जाते.
-
पशुंची काळजी घेण्यासाठी पशुवैद्यकिय अधिकारी छावणीत
तैनात असतो.
छावणीत भेटलेल्या वयोवृध्द शेतक-यांच्या मते १९७२
सालचा दुष्काळ पाण्याचा नव्हता, धान्याचा होता. तेव्हा रोजगार हमी
योजनेतून खडी फोडण्याचे काम केले होते. तेव्हा विहिरींना पाणी होते. आज
पाणी शोधण्यासाठी १३०० फुटांपेक्षा जास्त खोल जावे लागते आहे. कॅश
क्रॉपचा हव्यास याला कारणीभूत आहे..jpg)
छावणी संचालक व सांगोलाचे नगराध्यक्ष श्री. बनकर साहेबही आम्हाला
या ठिकाणी भेटले. त्यांच्याबरोबर आम्ही छावणीची पाहणी केली. मोठ्या
पदावर कार्यरत असणा-या बनकर साहेबांनी अतिशय आस्थेवाईकपणे आम्हांला
माहिती दिली. छावणीचा कारभार कसा काटेकांरपणे चालविला जातो याचे
प्रत्यंतर पाहणीमध्ये दिसले. श्री. बनकर साहेबांचे आणि इतर
सर्वांचे आभार मानून आम्ही तेथून निघालो. |